गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी आणि भाविक कोकणाकडे रवाना होत असताना रेल्वे गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. अशातच गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना यंदाही अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. सीएसएमटीहून कोकणाच्या दिशेने जाणारी कोकणकन्या एक्स्प्रेस एखाद्या स्थानकावर आल्यानंतर गाडीतील प्रवाशांनी दरवाजे आतून बंद करून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.
रात्री उशिराने सुटलेली कोकण कन्या ठाणे स्थानकावर पोहोचली असता त्यानंतर गर्दीमुळे गाडीच्या आत असलेल्या प्रवाशांनी दरवाजे बंद करून घेतला. त्यामुळे फलाटावर असलेल्या प्रवाशांना गाडीमध्ये चढता आले नाही आणि एकच गोंधळ उडाला. समोर आलेल्या माहितीनुसार, रात्री 11:30 वाजता सीएसएमटी (CSMT) स्थानकावरून सुटलेली कोकणकन्या ठाणे स्थानकावर आली असता, गाडीच्या आत असलेल्या प्रवाशांनी दरवाजे बंद करून घेतल्यामुळे बाहेरच्या प्रवाशांनी त्यांच्याशी डाटापट झाली.
गाडीचा दरवाजा उघडण्याची विनंती करूनही तो बंदच राहिल्याने बाहेर उभ्या असलेल्या प्रवाशांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आणि काही वेळातच स्थानकावर एकच गोंधळ उडाला. जागा मिळवण्यासाठी आणि गाडीत चढण्यासाठी आधीपासूनच मोठी गर्दी असताना दरवाजे बंद केल्यामुळे बाहेरील प्रवासी आणि गाडीतील प्रवाशांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याची माहिती आहे.
गणेशोत्सवाला अवघे काही दिवस राहिले असून कोकणात येणाऱ्या गणेश भक्तांच्या वाटेतील अडथळे यंदाही कायम आहेत. गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने रेल्वे प्रवास अधिक नियोजनबद्ध आणि सुरळीत करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.